'या' संस्थेच्या कार्यकारी मंडळात राजे समरजितसिंह घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती

'या' संस्थेच्या कार्यकारी मंडळात राजे समरजितसिंह घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती

कागल (प्रतिनिधी) - दि डिस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकारी मंडळात शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे संचालक राजे समरजितसिंह घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली. असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडीबाबत पत्राद्वारे कळविले.

दि डिस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संप्पन्न झाली. या सभेत सर्वानुमते ही निवड केली. सन २०२५ ते २०२८ या कालावधी करिता कार्यकारी मंडळावरती सदस्य म्हणून घाटगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिस्टिलरी प्रकल्पधारक कारखाने व शासन यांच्यातील दुवा म्हणून समस्या सोडवण्यासाठीचे महत्वपूर्ण कार्य या संस्थेच्या माध्यमातून १९७२ पासून होत आहे.

याआधी शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदाची तर विद्यमान अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे या संचालक म्हणून कार्यरत आहेत.आता घाटगे यांच्या निवडीमुळे शाहू परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून शाहूच्या सभासद शेतकऱ्यातून या निवडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.

 शाहू साखर कारखान्याने २००२साली साठ हजार लिटर दैनंदिन क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली होती. त्यानंतर गतवर्षी या प्रकल्पाचे विस्तारीकरण करून आता एक लाख ऐंशी हजार दैनंदिन क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे.

सीएचे उच्च शिक्षण घेतलेले राजे समरजितसिंह घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे २०११ पासून आजतागायत संचालक आहेत. तर २०१५ ते २०२१ यादरम्यान शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.या शिवाय शाहू ग्रुप मधील राजेविक्रमसिंह घाटगे सहकारी बँक, शाहू कृषी संघ, शाहू दूध संघ अशा विविध संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहेत. 

..हा तर शाहूच्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान 

दि महाराष्ट्र डिस्टिलरी असोसिएशन ऑफ मुंबई या राज्य पातळीवरील संस्थेवर काम करण्याची मिळालेली संधी आनंददायी आहे.असोसिएशनच्या वेळोवेळी होणाऱ्या सभांना उपस्थित राहून असोसिएशनच्या महत्त्वाच्या कामकाजामध्ये लक्ष घालुन या माध्यमातून डिस्टलरी प्रकल्पधारक कारखान्यांच्या अडीअडचणी शासन पातळीवर मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे वाटचाल सुरू असताना या निवडीमुळे वैयक्तिक माझा नव्हे तर 'शाहू'च्या सर्व सभासद शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.