भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने १८ व १९ जुलै रोजी एसआयआर विशेष अभियानाचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभरात सध्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर महानगर मधील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, या उद्देशाने व्यापक जनजागृती आणि सहाय्य मोहीम राबविण्यात येत आहे.
या विशेष अभियानांतर्गत शनिवार, दि. १८ जुलै आणि रविवार, दि. १९ जुलै रोजी शहरात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बीएलए-२, तसेच सर्व कार्यकर्ते आपल्या-आपल्या बूथमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन, जनजागृती करणार आहेत.
पात्र मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच "एक व्यक्ती – एक मत" या भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.
या विशेष अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.




