जिल्ह्यात '100 दिवस 100 शाळा' उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जागृतीचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी ‘100 दिवस 100 शाळा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर मार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील किमान 100 शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये हेल्मेटचा वापर, रस्ता चिन्हे व इशारे, अपघातग्रस्तांना मदत करण्याचे महत्त्व, पादचारी, सायकलस्वार आणि शालेय बस सुरक्षेचे नियम, सुरक्षित वाहन चालविण्याचे कौशल्य, वेगमर्यादा व मद्यप्राशन प्रतिबंध आदी बाबींवर भर दिला जात आहे.
आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 15 शाळांना भेटी देण्यात आल्या असून, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने व निता सूर्यवंशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाळा प्रशासनामधून या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाला सरासरी 500 ते 600 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
जुलै 2025 अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा जागृतीसाठी भेटी दिल्या जाणार असून एकूण किमान 100 शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेविषयी माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयीची जागरूकता वाढेल, वाहन चालवताना दक्षता बाळगली जाईल आणि भविष्यात जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.