माणुसकीला काळिमा फासणारी दुर्घटना ; अन् पत्नीसाठी पतीने घेतला असा निर्णय

माणुसकीला काळिमा फासणारी दुर्घटना ; अन् पत्नीसाठी पतीने घेतला असा निर्णय

नागपूर - नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक हृदयद्रावक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वाहनांना हात जोडून मदतीची याचना करूनही कोणीही थांबले नाही. शेवटी, हतबल पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून घरी नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सिवनी (मध्यप्रदेश) येथील अमित भुरा यादव (३५) आणि त्यांची पत्नी ग्यारसी अमित यादव मागील दहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा, कोराडी परिसरात वास्तव्यास होते. रक्षाबंधनाच्या दिवशी ते दुचाकीवरून लोणाराहून ग्यारसी यांच्या माहेरी, करणपूर (मध्यप्रदेश) येथे निघाले होते.

मोरफाटा भागात त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये ग्यारसी यादव रस्त्यावर पडल्या आणि ट्रकखाली येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातानंतर अमित यादव यांनी रस्त्यावरील वाहनांना हात जोडून, अश्रूंनी मदतीची विनंती केली; मात्र कोणतीही मदत न मिळाल्याने अखेर त्यांनी पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून घरी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा क्षण टिपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पाहून काही जणांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मदतीची अपेक्षा फोल ठरल्याने ते थांबायला तयार नव्हते. यानंतर महामार्ग पोलिसांनी त्यांना अडवले आणि मृतदेह ताब्यात घेतला. ग्यारसी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला.

https://x.com/harish_malusare/status/1954777527639228778?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1954777527639228778%7Ctwgr%5Eefd6eff667fcfa8d21ba08da1f532029d6fe954f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.indiatimes.com%2Fmaharashtra%2Fnagpur%2Fnagpur-husband-carrying-wife-body-on-bike-viral-video-on-social-media%2Farticleshow%2F123229135.cms 

या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. अपघातानंतरही कोणतीही मदत न मिळणे ही मानवी संवेदनांचा अपमान असल्याचे समाजमाध्यमांवरून ठळकपणे व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. तसेच अमित यादव यांची मानसिक स्थिती पाहता त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.