पहिल्यांदाच अभिनयात ए. आर. रहमान; ‘मूनवॉक’ मधून प्रेक्षकांसमोर नवा अवतार

पहिल्यांदाच अभिनयात ए. आर. रहमान; ‘मूनवॉक’ मधून प्रेक्षकांसमोर नवा अवतार

मुंबई -ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस एका वेगळ्याच भूमिकेत येणार आहेत. दशकानुदशके आपल्या संगीताने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ए. आर. रहमान आता प्रथमच कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दिसणार आहेत. प्रभुदेवा अभिनीत ‘मूनवॉक’ या आगामी चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. मनोज एन. एस. दिग्दर्शित आणि बिहाइंडवुड्स प्रॉडक्शन निर्मित ‘मूनवॉक’ हा एक विनोदी चित्रपट असून, तो 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ए. आर. रहमान ‘एंग्री यंग दिग्दर्शक’ च्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहमान केवळ प्रमुख भूमिकेतच झळकणार नाहीत, तर त्यांनी या चित्रपटातील पाचही गाणी स्वतः गायली आहेत. त्यामुळे ‘मूनवॉक’ चे संगीत पूर्णपणे ए. आर. रहमान यांच्या आवाजात आणि त्यांच्या खास शैलीत अनुभवता येणार आहे. अभिनय आणि गायन या दोन्ही आघाड्यांवर त्यांचा नवा पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक मनोज एन. एस. म्हणाले, प्रभुदेवा आणि ए. आर. रहमान यांच्यासोबत ‘मायले’ या गाण्याचे चित्रीकरण केले. शूटिंगचा अनुभव अतिशय अद्भुत होता आणि सर्व काही सुरळीत पार पडले.  सुरुवातीला रहमान केवळ गाण्यांपुरते मर्यादित होते, मात्र नंतर त्यांना मोठी भूमिका देण्यात आली, जी त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्यांच्या अभिनयाचे सेटवरील सर्वांनी भरभरून कौतुक केले.

या चित्रपटात प्रभुदेवा ‘बाबुती’ नावाच्या तरुण कोरिओग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता योगी बाबू विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार असून, कावरीमान नारायणन, आट्टुक्कल अझगू राझा आणि दुबई मॅथ्यू यांसारखी अनेक पात्रे ते साकारणार आहेत. योगी बाबूच्या या बहुरंगी भूमिकांचे विशेष कौतुक होत आहे.

याशिवाय अर्जुन अशोकन, सत्ज, सुष्मिता, निश्मा, स्वामीनाथन, रेडिन किंग्सले, राजेंद्रन, दीपा अक्का, संतोष जैकब आणि राजकुमार यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीताप्रमाणेच अभिनयातही ए. आर. रहमान प्रेक्षकांची मने जिंकणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.