‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ ट्रेलर अनावरणाने शिवशौर्याचा इतिहास पुन्हा जिवंत
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रम आणि नेतृत्वामुळेच नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अचूक रणनीती आणि दूरदृष्टीमुळे इतिहासात अजरामर झाले आहेत. असामान्य नियोजनकौशल्याच्या बळावर त्यांनी बलाढ्य शत्रूंनाही धूळ चारली. औरंगजेबासारख्या कपटी बादशहाला पुरून उरणाऱ्या शिवरायांची आग्रा भेट हा शौर्याचा अत्यंत धाडसी अध्याय होता. हाच इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य मराठी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने.

शिववंदना आणि शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाड्यांनी ट्रेलर अनावरण सोहळ्याला ऐतिहासिक भारदस्तपणा लाभला. शिवरायांच्या कणखर नेतृत्वाची, धैर्याची आणि मुत्सद्देगिरीची झलक ट्रेलरमधून प्रभावीपणे अनुभवायला मिळते. मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढत्या व्याप्तीसोबतच त्याच्या मार्केटिंगच्या संकल्पनाही अधिक नावीन्यपूर्ण होत आहेत. ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील व्यक्तिमत्त्वे AI आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. ट्रेलर अनावरणप्रसंगी शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. हा उपक्रम मराठी सिनेसृष्टीसह शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरत आहे. हा चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विविध भाषांत काही सेकंदांत देतो.
औरंगजेबाचा कडेकोट पहारा, चारही बाजूंनी धोका आणि निराशेचे सावट असतानाही शिवाजी महाराजांनी आग्रा स्वारी यशस्वी कशी केली, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. माणसांची अचूक पारख, राजकीय जाण आणि दूरदृष्टीच्या जोरावर महाराजांनी ही स्वारी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, दिग्पाल लांजेकर लिखित - दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाचा, शिस्तबद्ध आखणीचा आणि शौर्याचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला.
चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार यांच्यासह अनेक तगडे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओजकडून या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण करण्यात येणार आहे.




