प्रबळ आत्मविश्वास हेच खरे यशाचे गमक - IFS ऑफिसर संदीप सूर्यवंशी
इचलकरंजी (प्रतिनिधी) - मनुष्याकडे प्रबळ आत्मविश्वास असल्यास तो कोणतेही कार्य यशस्वीरित्या पार पाडतो. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्रबळ आत्मविश्वास हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. विद्वत्तेला आकार द्यावयाचा असेल व स्वतः मध्ये आमुलाग्र बदल घडवून यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकाने स्वतः मधील प्रबळ आत्मविश्वास जागृत ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी यश तुमचेच असेल असे मौलिक मार्गदर्शन इंडियन फॉरेस्ट सर्विसेस विभागातील DCF अधिकारी संदीप सूर्यवंशी यांनी केले. ए.आर तांबे संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेस आयोजित स्पर्धा परीक्षा समुपदेशन व मार्गदर्शन सेमिनार कार्यक्रमाला संदीप सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उपस्थित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाला लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त वस्तू व सेवाकर उपायुक्त चंद्रकांत मंचरे यांनी आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचे महत्त्व आधोरेखित केले. जीवनामध्ये येणारी संकटे फक्त अडचणी निर्माण करीत नसून काही गोष्टी शिकवून जातात. संकट व कठीण प्रसंग या गोष्टीमुळे अपयश येणं ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून आपण आपली यशाची वाट शोधली पाहिजे हा महत्त्वाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे अध्यक्ष ए.आर तांबे आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतःच्या कर्तुत्वावर यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या समाजातील अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मुळेच प्रशासकीय विभाग मजबूत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रतिभावंत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सदैव घेत राहावे असा विचार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापकीय सदस्य सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे, सिव्हिल सर्विसेस शिक्षक वृंद आदींसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




