नानीबाई चिखलीत प्रकाश झोतात रंगला कबड्डीचा थरार
नानीबाई चिखली (प्रतिनिधी) - चिखली येथील कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात नानीबाई चिखलीच्या शिव - शाहू तर महिला गटात शिंगणापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतनच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे बंधू व कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत एकोणतीस संघ सहभागी झाले. यामध्ये पुरुष गटात अठरा तर महिला गटात अकरा संघानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विजेत्यांना लेखिका व इतिहास अभ्यासिका नंदितादेवी घाटगे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य प्रा. अण्णासाहेब गावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले. यावेळी कर्नल (नि) शिवाजीराव बाबर,शालिनी बाबर,कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तामामा खराडे,राजे बँकेचे संचालक अमर चौगुले, चीफ एक्झिक्यूटिव्ह शिवाजीराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्यांना सव्वा लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह आकर्षक चषक बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
अंतिम सामन्यात पुरुष गटात शिव - शाहू संघाने एकोंडीच्या स्वामी समर्थ संघावर अठ्ठावीस विरुद्ध पंधरा अशा गुण फरकाने मात करत विजेतेपद पटकाविले. तर महिला गटात शाहू विद्यानिकेतनच्या संघाने म्हालसवडेच्या साधना संघावर अठ्ठावीस विरुद्ध चोवीस अशा गुण फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. पुरुष गटात नवजीवन शिंदेवाडी व स्वराज्य सांगाव यांनी तर महिला गटात शाहू स्पोर्टस् नानीबाई चिखली व शिवशक्ती हुपरी यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला.
पिराजीराव घाटगे शारीरिक शिक्षण धर्मादाय न्यास कोल्हापूर यांच्या वतीने श्रीमंत जयसिंगराव घाटगे क्रीडा संकुल येथे प्रकाशझोतात या स्पर्धा झाल्या.सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील महिला व पुरुष दोन्ही गटात चुरशीचे सामने झाले. त्यास कबड्डी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या आजी - माजी खेळाडूंनी या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील वैयक्तिक मानकरी..!
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांमध्ये पुरुष गटात नानीबाई चिखलीच्या प्रवीण दड्डे यांने अष्टपैलू खेळाडू,विनायक बेनाडे यांनी उत्कृष्ट पकड तर एकोंडीच्या सतीश कुंभार यांनी उत्कृष्ट चढाईसाठीचे बक्षीस पटकावले. तर महिलांच्या गटात शिंगणापूरच्या प्रतीक्षा गुरव हिने अष्टपैलू खेळाडू नानीबाई चिखलीच्या समीक्षा वाडकरने उत्कृष्ट पकड तर साधना म्हालसवडेच्या साक्षी कोपार्डेने उत्कृष्ट चढाईसाठीचे बक्षीस पटकाविले.




