शिर्डी महोत्सवात विक्रमी भक्तिसागर ; नऊ दिवसांत तब्बल 'इतकी' देणगी साईचरणी अर्पण
शिर्डी साईबाबा - नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत आयोजित ‘शिर्डी महोत्सव’ भक्तिसागराने ओसंडून वाहिला. 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांत देश - विदेशातून सुमारे 8 लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत भाविकांनी श्रद्धेने तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपयांची विक्रमी देणगी साई संस्थानला अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

महोत्सव काळात विविध माध्यमांतून देणगी प्राप्त झाली. दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये, तर पीआरओ सशुल्क पासमधून 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये जमा झाले. डिजिटल माध्यमांना मोठी पसंती मिळाली असून डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक व मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये प्राप्त झाले.
याशिवाय 26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83 हजार 673 रुपये संस्थानला मिळाले. सोने-चांदीच्या स्वरूपातही लक्षणीय दान झाले असून त्यात 293 ग्रॅम सोने (सुमारे 36.38 लाख रुपये) आणि सुमारे 6 किलो चांदी (सुमारे 9.49 लाख रुपये) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण-हिरे जडीत आकर्षक मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटात 153 कॅरेट हिरे आणि 586 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून दर्शन व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले. अन्नदानाची परंपराही व्यापक स्वरूपात राबवण्यात आली. नऊ दिवसांत 6 लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतला, तर 1 लाख 9 हजार भाविकांना अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. याच काळात 7 लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून 2.30 कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तसेच 5 लाख 76 हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसाद देण्यात आला.
प्राप्त देणग्यांचा उपयोग लोककल्याणासाठी केला जात असल्याचे गाडीलकर यांनी स्पष्ट केले. साईबाबा रुग्णालय व साईनाथ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्थांचे संचालन तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी या निधीचा विनियोग केला जातो. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि सुरक्षा रक्षकांनी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी सांगितले.




