ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का ; विश्वास पाटील (आबाजी) शिंदे गटात प्रवेश करणार
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवण्याचा निर्धार केलेल्या काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते व आ. सतेज पाटील यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील ऊर्फ आबाजी हे उद्या १० जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला मोठा हादरा बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेच्या राजकारणात विश्वास पाटील हे मोठे नाव नसले, तरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात गोकुळ हे सर्वात प्रभावी केंद्र मानले जाते. गोकुळवर आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आ. सतेज पाटील यांना आगामी काळात मोठा संघर्ष करावा लागणार आहे. विश्वास पाटील शिंदे गटात प्रवेश करत असल्याने गोकुळच्या राजकारणावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत.

महायुतीकडून गोकुळमध्ये आतापासूनच डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. कोणत्याही परिस्थितीत गोकुळची सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आ. सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ सध्या विरोधात असले, तरी गोकुळमध्ये मात्र दोघे एकत्र आहेत. दुसरीकडे, गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेला महाडिक गट सध्या विरोधात आहे. आ. पाटील - मंत्री मुश्रीफ यांच्या युतीला सुरुंग लावण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात असून त्याचे प्रतिबिंब महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. कोल्हापुरात आ. सतेज पाटील विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगला आहे. काँग्रेसची संपूर्ण निवडणूक यंत्रणा आ. सतेज पाटील एकहाती सांभाळत असून ८१ जागांपैकी ७५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. उर्वरित सहा जागांवर शिवसेना ठाकरे गट लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीशी हातमिळवणी केली आहे.
करवीर तालुक्यात दूध संघांच्या माध्यमातून विश्वास पाटील यांची मजबूत पकड आहे. गेली चार दशके ते सक्रिय राजकारणात असल्याने जवळपास प्रत्येक गावात त्यांचा प्रभाव आहे.




