‘डॉन 3’ मधून रणवीर सिंह आऊट तर 'या' अभिनेत्याची होणार एंट्री..!

‘डॉन 3’ मधून रणवीर सिंह आऊट तर 'या' अभिनेत्याची होणार एंट्री..!

मुंबई - धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंहची चर्चा देश - विदेशात रंगली होती. या चित्रपटातील त्याचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. रणवीर लवकरच ‘डॉन 3’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता तो या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार रणवीरने स्वतःहून हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला, तर काही रिपोर्ट्समध्ये त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, रणवीर सिंहनंतर ‘डॉन 3’ साठी अभिनेता हृतिक रोशनला संपर्क साधण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. हृतिक रोशन ‘डॉन 3’मध्ये मुख्य भूमिकेत दिसू शकतो. विशेष म्हणजे ‘डॉन 2’ मध्ये हृतिकची छोटी पण प्रभावी भूमिका होती, त्यामुळे तो या फ्रँचायझीच्या प्रमुख भूमिकेसाठी योग्य ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

फरहान अख्तर आणि त्याची टीम अंतिम निर्णय काय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हृतिक रोशन खरोखरच ‘डॉन 3’ चा नवा चेहरा ठरणार का, याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही बातमी समजताच हृतिकचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. सध्या ‘डॉन 3’ बाबतच्या चर्चा प्राथमिक टप्प्यात असून, निर्मात्यांना या भूमिकेसाठी भक्कम स्टार इमेज आणि मजबूत पोर्टफोलिओ असलेला अभिनेता हवा आहे. याआधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी ‘डॉन’ च्या भूमिकेला न्याय दिला आहे. अमिताभ बच्चन अभिनीत ‘डॉन’ 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता, तर शाहरुख खानचा ‘डॉन’ 2006 आणि ‘डॉन 2’ 2011 मध्ये प्रदर्शित झाले होते.

दरम्यान, धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंह ‘डॉन 3’ मधून बाहेर पडल्याचे वृत्त असले तरी, याबाबत निर्माते किंवा कलाकारांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंह आता दिग्दर्शक जय मेहता यांच्या आगामी ‘प्रलय’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित करणार आहे.