सरसेनापती संताजी घोरपडे स्मारका बाबतचे उपोषण मागे
सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पुतळा, स्मारक व बहुउद्देशीय सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीकडेच राहीला पाहीजे. यासाठी सुरू असलेले उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते सरबत देण्यात आला आणि धनाजी सेनापतीकर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता सी.ए. पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पत्र दिले.

सेनापतीकर यांची तब्येत बिघडत चालली होती. उपोषणाच्या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य केंद्राचे पथक बसून होते. दुपारी सेनापतीकर यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याचवेळी ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी येथे भेट दिली. सेनापतीकर यांची प्रकृती पाहून ते म्हणाले, ‘सामाजिक प्रश्न यापुढेही सोडवता येतील, मात्र उपोषणकर्त्याचा जीव महत्वाचा आहे. मार्ग काढून उपोषण संपवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याशी वारंवार संपर्क करून त्वरित भेट देण्यासाठी आग्रह धरला. तसेच कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर दुपारी हालचाली गतिमान झाल्या. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी येथे भेट दिली. यावेळी सेनापती कर म्हणाले, सार्वजनिक बांधकामच्या पाटील यांनी जनतेची दिशाभूल करू नये. ग्रामपंचायतचे ठराव काय होते? कागदपत्रे तपासली का? ती खरी आहेत याची खात्री केली का? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. स्मारक हॉल सह सार्वजनिक राहिले पाहिजे अशी मागणी केली.
यावेळी अमरदीप वाकडे म्हणाले, स्मारकाच्या हॉलचा ताबा यापूर्वी वाचनालयाकडे दिला गेला आहे. मात्र याचा अंतिम निर्णय होईपर्यंत केवळ देखभालीशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी हॉलचा वापर करायचा नाही असे वाचनालयाला लेखी पत्र दिल्याचे सांगितले. तसेच पुढे या बहुउद्देशीय हॉलचा ताबा कोणाकडे द्यायचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुनावणी होईल त्यानंतर निर्णय होईल.’ यानंतर सेनापती कर यांना सरबत देऊन उपोषण संपले.
यावेळी दत्तात्रय वालावलकर, प्रदीप चव्हाण, महेश देशपांडे, परशुराम तावरे, मंगेश कोळी, तुकाराम भारमल, बाबुराव गुरव, अतुल दिवटणकर,मोहन मोरे आधी उपस्थित होते.




