मंगळवारी साडेपाच नंतर प्रचारास व जाहिरातींना बंदी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता संपणार असल्याने, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यापूर्वीच दिली आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी, म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही.




