कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना : 20 दिवसांच्या मुलीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आईचं मातृत्व

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील जुनी मोरे कॉलनीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि भावनांना हादरवून टाकणारी घटना घडली. अवघ्या 20 दिवसांच्या चिमुकलीसाठी आईने आपले अखेरचे श्वासही तिच्या सेवेसाठी अर्पण केले. पहाटे मुलीला दूध पाजत असताना रचना चौगले या मातेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रचना (वय 27) आणि स्वप्नील चौगले यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. तेव्हापासून ते आनंदी संसार करत होते. स्वप्नील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. 2 जुलै रोजी रचनाने आपल्या दुसऱ्या कन्येला म्हणजेच चिमुकल्या पियुषाला जन्म दिला होता. सात वर्षांची स्वरा आणि नुकतीच जन्मलेली पियुषा यांच्यासह घरात सणासारखा आनंद होता. काही दिवसांपूर्वीच मोठ्या आनंदात पियुषाचं बारसं पार पडलं होतं.
परंतु बुधवारी पहाटे, पियुषा रडू लागल्याने रचनाने तिला दूध पाजायला सुरुवात केली. बाळ झोपले, पण थोड्याच वेळात पुन्हा रडायला लागले. मात्र यावेळी रचना काहीच प्रतिसाद देत नव्हती. आईने आणि पतीने प्रयत्न करूनही ती न जागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
रचना आशा वर्कर म्हणून महिलांच्या आरोग्य व जनजागृतीसाठी कार्यरत होती. तिचा स्वभाव हसतमुख, मदतीस तत्पर आणि समाजाभिमुख होता. त्यामुळे ती परिसरात अत्यंत लोकप्रिय होती. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात आणि तिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.
चौगले कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 20 दिवसांच्या पियुषा आणि तिच्या सात वर्षांच्या बहिणीवरून आयुष्यभरासाठी आईचं छत्र हरपलं आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.