गगनगडावर 08 जानेवारी रोजी हजरत गैबीपीर - श्री विठ्ठलाई देवीचा उरूस उत्सव..
गगनबावडा (प्रतिनिधी) - गगनबावडा येथील गगनगडावरील हजरत गैबीपीर व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी 8 जानेवारी रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंग रंगोटी करण्यात आली आहे. शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ गगनगडावर नेण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता गलेफ दर्ग्यातील तुरबतीवर निलराजे पंडित बावडेकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाईदेवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच बुधवारी (07 डिसेंबर) संदल चढविण्यात येणार आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.
उत्सवाच्या मुख्य दिवशी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी गगनगड देवस्थानच्या वतीने बापूसाहेब पाटणकर, पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्यासह भाविक या उत्सवासाठी येथे उपस्थिती लावतात. उरुसाचा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या उरूस उत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी रफिक काझी यांनी यावेळी दिली.




