डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नवोन्मेष अभियानात चमकदार कामगिरी

इचलकरंजी (प्रतिनिधी) - डीकेटीई मधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी नवोन्मेष हेच भविष्य घडवते हा विश्वास कृतीत उतरवत पाच महिन्याच्या कालावधीत देशातील शाळेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मेड इन थ्रीडी सीड द फयुचर एंटरप्रनरर्स या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमांतर्गत प्रोफेशनल मेंटर्स म्हणून शालेय विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करण्याची ऐतिहासिक संधी साधली.
हा उपक्रम ‘ला फांउडेशन द सॉल्ट सिस्टीम‘ व ‘लेंड अ हॅण्ड इंडिया‘(लाही,पुणे)या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला होता. यासाठी नीती आयोगाच्या अटल टिंकरिंग लॅब्स च्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर आधारित देशातील निवडक शाळांमध्ये एक प्रशिक्षित शिक्षक आणि सहा विद्यार्थ्यांचा स्टार्टअप शैलीतली संघ तयार करुण त्यांना सीड फंडिग च्या माध्यमातून त्यांच्या सृजनशील कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनात बदलण्याची संधी मिळाली. पुणे येथील या स्पर्धेमध्ये इन्व्होवेशन, डिझाईन आणि उदयोजकता या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील २६० हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला.
डीकेटीई कडून अनुज लुगडे व अरमान नायकवडी यांनी अटल इन्व्होवेशन मिशन,नीती आयोग, दिल्ली व द सॉल्ट सिस्टीम या अंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभाग घेवून चमकदार कामगिरी केली. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी प्रत्येकी रु २१ हजार उत्पादन विकास निधी आणि रु. ६ हजार मानधन देण्यात आले. त्याचबरोबर पुण्यातील कारीगर स्कुल ऑफ अप्लाईड लर्निंग येथे उदयोग तज्ञांकडून अत्याधुनिक मेंटॉरशिप प्रशिक्षण घेण्याची अमूल्य संधी मिळाली. या प्रशिक्षणातून त्यांनी प्रत्यक्ष उदयोगात वापरल्या जाणा-या द सॉल्ट सिस्टीमच्या थ्री डी एक्सपेरिएन्स सॉफटवेअर चा सखोल अभ्यास केला.
डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, इन्व्होवेशन सेल व स्टार्टअप कट्टा तसेच डीकेटीईतील विविध आधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते. यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशापातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिध्द केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. सुयोग रायजाधव यांचे मार्गदर्शन लाभले.