विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र विषयात संशोधनाची कास धरावी - प्रा. वाय.के.विजय
इचलकरंजी (प्रतिनिधी) - श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट या शैक्षणिक संस्थेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेचे महत्व व संधी याविषयी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सीआयएसटी जयपुरचे संचालक, विवेकानंद ग्लोबल युनिव्हर्सिटी जयपूरचे कुलगुरू, भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक, भौतिकशास्त्र शिक्षण केंद्राचे संचालक व भारत येथे नॉन कन्व्हेनशनल एनर्जी रिसोर्सेस सेंटरचे संचालक म्हणून राहिलेले प्रा. वाय.के. विजय उपस्थित होते. या परिसंवादासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भौतिकशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकाचे महत्त्व व भौतिकशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकाची संकल्पना याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र विषयात संशोधनाची कास धरावी असेही यावेळी ते म्हणाले.

प्रा. वाय.के. विजय यांनी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयातील काही महत्त्वाच्या अशा प्रात्यक्षिकांचे प्रयोग करून दाखवले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत IES, IAPT व अन्य परीक्षेचे महत्त्व पटवून देऊन आपण सुद्धा भौतिकशास्त्र विषयातल्या काही संकल्पनेवर संशोधन करू शकता हा मूलमंत्र दिला. भारत देशामध्ये सेमीकंडक्टर याविषयी म्हणावे असे संशोधन झालेले नाही. ही एक आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. याबाबत आपण आपल्या कौशल्याने व अभ्यासाने या गोष्टीवर संशोधन करू शकता असे मत व्यक्त केले.
प्रा.वाय.के विजय यांच्यासारख्या थोर संशोधकांचे मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन वृत्तीला मिळालेली चालनाच आहे. याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच फायदा करून घ्यावा असे मत संस्थेचे अध्यक्ष ए.आर.तांबे यांनी व्यक्त केले.
या परिसंवादाला संस्थेचे समन्वयक संगीता पवार, सुप्रिया कौंदाडे, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे, बीपलाब पॉल, संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.




