'इतकं' उत्पन्न असल्यास लाडक्या बहिणींचा अर्ज बाद ; नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार..?
मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता ई - केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या महिलांचे अर्ज ई - केवायसी प्रक्रियेत उघडकीस आल्यास बाद होणार आहेत. लाभार्थींनी 31 डिसेंबरपर्यंत ई - केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई - केवायसीद्वारे लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती शासनाच्या नोंदीत स्पष्ट होणार आहे. ज्या महिलांनी योजनेचे निकष न पाळता लाभ घेतला असेल, त्यांना पुढे हा लाभ मिळणार नाही. विशेषतः उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिलांना ई - केवायसीतूनच अपात्र ठरवले जाईल.

योजनेत आतापर्यंत सुमारे अडीच कोटीहून अधिक महिलांनी नोंदणी केली असून पडताळणीदरम्यान 52 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले होते. आता ई - केवायसीनंतर मिळालेली संपूर्ण माहिती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. विभागाकडून तपासणी करून पात्रता निश्चित केली जाईल.
महिला तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचीही ई - केवायसी केली जाणार असल्याने उत्पन्न व वयासंबंधी सर्व माहिती शासनाला उपलब्ध होणार आहे. स्थापित निकषांनुसार उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास महिलांना योजना लाभ पुढे कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे.
गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पुढील आठ दिवसांतच नोव्हेंबरचा हप्ता खात्यात जमा होईल, अशीही माहिती समोर आली आहे.




