बीडशेड परिसरात मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस ; शेती औषध दुकानासह पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास

बीडशेड परिसरात मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस ; शेती औषध दुकानासह पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास

करवीर (विश्वनाथ मोरे) - करवीर पश्चिम भागातील व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडशेड परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री शेती औषध दुकानासह पाच ते सहा दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास चोरट्यांनी श्री नृसिंहलक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून काउंटरमधील सुमारे १ लाख २२ हजार रुपये रोख रक्कम व इतर मुद्देमाल लंपास केला. याचबरोबर परिसरातील वेटझोन पशुखाद्य दुकान याठिकाणीही गल्ल्यावर डल्ला मारण्यात आला. तसेच महालक्ष्मी प्लंबिंग, शिवशक्ती ट्रेडर्स यांच्यासह पाच ते सहा दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. सद्गुरू चप्पल दुकान येथे चोरट्यांनी पत्रा उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत प्लायवूड असल्याने दुकानात प्रवेश करता आला नाही, त्यामुळे संभाव्य चोरी टळली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार महेश बांबरे व डी.बी. पथकाचे हवालदार अमित जाधव पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या परिसरात लहान - मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असूनही येथे पोलीस चौकी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता तरी प्रशासनाने दखल घेऊन पोलीस गस्त वाढवावी व या परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी नागरिक व व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे.