प्रचाराची मुदत संपल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना वेगळी सवलत... - खा. संजय राऊत
मुंबई - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून आचारसंहिता लागू झाली आहे. उद्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने जाहीर प्रचार थांबला असला, तरी निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. खा. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना वेगळी सवलत दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एकदा प्रचार संपला की तो सर्वांसाठीच संपायला हवा. मात्र सध्या वेगळंच काहीतरी सुरू आहे. घरोघरी जाऊन पैशांचे आणि साड्यांचे वाटप होत आहे. साड्यांमधून किंवा वर्तमानपत्रातून पैसे दिले जात असल्याचे प्रकार घडत आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

खा. संजय राऊत पुढे म्हणाले, निवडणूक हिंदू - मुस्लीम मुद्द्यावर नेली जात असल्याचा दावा केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली जात असून दुबार मतदार आढळल्यास ‘ठोका’ असे आव्हान दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाकडे कथित घोटाळ्यांमधून पैसा असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्या विधानांचाही उल्लेख केला. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत त्यांनी “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला,” असे म्हणत उपरोधिक टोला लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसांबद्दल काय माहिती आहे? वडापाव हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, त्याची खिल्ली उडवू नका,” असे म्हणत त्यांनी टीका केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हिंदू - मुस्लीम डाव अपयशी ठरल्याचे सांगत महाराष्ट्रातही निवडणूक आयोगासमोर नियम व आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “हरामाचा पैसा वाटला जात आहे, तो ओळखण्याची जबाबदारी मराठी माणसांची आहे,” असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकावले जात असल्याचा दावाही केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.




