'या' कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करावी लागली - राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) - कागल व मुरगूड नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आपल्या शाहू आघाडीमार्फत ही निवडणूक ताकतीने लढविण्यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी केली आहे.मात्र गेल्या दोन दिवसात अनपेक्षितपणे घडामोडी झाल्या, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार यामध्ये आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करावी लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे .

त्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले आहे,आपल्या गटाच्या परंपरेप्रमाणे आपल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र अतिशय कमी वेळात याबाबतीत निर्णय घेऊन तडजोड करणे आवश्यक होते. कागल,मुरगूड शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व आपल्या शाहू आघाडीतील सर्व कार्यकर्ते यांना बळ देण्याच्या दृष्टीने असा निर्णय घ्यावा लागला.
आपल्या गटाच्या दृष्टीने निवडणुकीत युती किंवा तडजोडी बाबतचा असा निर्णय घेण्याची ही काही पहिली वेळ आहे असे नाही. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय राजेसाहेब यांनी सुद्धा कागलच्या शाश्वत विकासाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेतले होते व त्यास आपण सर्वांनी विश्वासाने साथ दिली होती, हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झालेली आहे.
याबाबतीत आपणा शाहू आघाडीतील सर्वांशी व युती झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी संयुक्तपणे संवाद साधण्यासाठी मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 रोजी मटकरी हॉल कागल येथे सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होत आहे. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत संयुक्तपणे आम्ही याबाबतची भूमिका मांडू असेही राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
स्वर्गीय राजे साहेब यांच्या संकल्पनेतील कागलच्या शाश्वत विकासासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्याच आदर्शांप्रमाणे या निमित्ताने तडजोड केली आहे.कागल व मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया असे आवाहनही राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.




