सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार... ; उपमुख्यमंत्री पवारांवर साधला हाकेंनी निशाणा

सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार... ; उपमुख्यमंत्री पवारांवर साधला हाकेंनी निशाणा

मुंबई - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात होताच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांनी जरांगेंची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जरांगे यांनी मुंबईकडे रवाना होताना आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचं स्पष्ट केलं. हे फक्त विरोधकांचं कारस्थान नसून, सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटातील आमदार आणि खासदार सुद्धा सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सहभागी आहेत हे मी जबाबदारीने सांगतो असंही ते ठामपणे म्हणाले. 

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, “मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे उपमुख्यमंत्री अजित पवार जरांगेकडून आई - माईची भाषा ऐकूनही गप्प का?” जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार जरांगेंना समर्थन देत असतील, तर याचा अर्थ खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही त्यांना पाठींबा आहे. "सरकार जर जरांगे सारख्या माणसाला पायघड्या घालत असेल, तर आम्हालाही आता भूमिका घ्यावी लागेल," असंही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह 

हाके यांनी आरोप केला की, जर जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, तर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण धोक्यात येईल. “आरक्षण हा केवळ सामाजिक नाही, तर संरक्षणाचा विषय आहे. जर हेच संरक्षण देणारे लोकच त्याला धोका पोचवत असतील, तर मग ओबीसी समाजाचं भवितव्य काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सर्व राजकीय पक्षांवर टीका करत म्हटलं की, “जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व पक्षीय आमदार, खासदार रसद पुरवत आहेत. आणि त्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे ओबीसींचं आरक्षण संपवणे.”

ओबीसींच्या एकतेचा इशारा

शेवटी, लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला की, “जर पन्नास टक्के ओबीसी समाज एकत्र आला, तर सत्ताधाऱ्यांची काय अवस्था होईल, याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. होय, ही एकता साधणं अवघड आहे, पण अशक्य नाही.” असंही ते म्हणाले.