सचिन अहिर शिंदे गटाच्या वाटेवर? उपसभापतीपदाचा अर्ज भरत ठाकरे गटाला हादरा
मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै 2026 रोजी होणार असून, त्याआधीच सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

या घडामोडीनंतर सचिन अहिर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील संख्याबळात घट झाल्याचेही बोलले जात आहे. विविध वृत्तांनुसार, ठाकरे गटाकडे आता केवळ पाच आमदार उरल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, वरळीतील बदलत्या राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत बदलांमुळे सचिन अहिर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेशाची घोषणा केलेली नाही.शिंदे गटाकडून त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे कोणते नवे समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




