शिवाजीराव महान नेते, त्यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ' दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावरून चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर गडिंग्लज येथील पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी "आमदार पाटलांवर बोलण्याइतका मी मोठा नाही" असं म्हणत ही टीका दुर्लक्षित केली आणि मिश्कीलपणे टोला लगावला.

यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुश्रीफ म्हणाले शिवाजीराव पाटील हे अतिशय महान नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत." तसेच, जिल्हा बँकेच्या चौकशीसंदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले.
तसेच, महसूल विभागाच्या कार्यक्रमात गडिंग्लजच्या सभापतींनी निधी मागितल्यावर, "तुमचा ७५% भाग चंदगडमध्ये येतो आणि तिथे 'महान व्यक्ती' असल्याने आम्ही निधी देऊ शकत नाही" अशी कोपरखळी मुश्रीफ यांनी मारली. त्यामुळे मुश्रीफ आणि पाटील यांच्यातील हा राजकीय कलगीतुरा सध्या चांगलाच रंगला आहे.
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते २५० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण शेंडा पार्क येथील ११०० खाटांचे रुग्णालय, तसेच केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, महेश सलवादे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




