तरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे ; अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
कागल: "तरुणाई ही सळसळत्या रक्ताची असते. इतिहास घडवायचा असेल तर तरुणच लागतात, त्याशिवाय कुठल्याही देशाचा इतिहास घडू शकत नाही. त्यामुळे तरुणाईने पेटून उठून समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे घेऊन जाण्याची गरज आहे," असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
"दीड दिवसांची शाळा आणि विपुल साहित्यसंपदा"
अण्णाभाऊ साठेंच्या संघर्षाची आठवण करून देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "अण्णाभाऊंचे वडील गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे अण्णाभाऊ अवघे दीड दिवसच शाळेत गेले. त्यांनी मुंबईतील दुकानांच्या पाट्या वाचत-वाचत अक्षरांची ओळख करून घेतली. मात्र, तरीही त्यांनी पोवाडे, कादंबऱ्या, पटकथा आणि लघुकथा अशी अथांग साहित्यसंपदा निर्माण करून साहित्यात नवा आदर्श निर्माण केला."
ते पुढे म्हणाले की, "अण्णाभाऊ हे महान सत्यशोधक साहित्यरत्न आणि कम्युनिस्ट विचारांचे चळवळीतील नेते होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते आपले गुरू मानत. ब्रिटिश राजवटीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला होता."
कागलमध्ये मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमादरम्यान विजय काळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान पार पडले. तसेच केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर आणि उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक उमेश सावंत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक राजू जाधव, रणजीत पाटील, विजय काळे, सतीश सोनुले, पॉल सोनुले, शहाजी सोनुले यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत अरविंद कारंडे यांनी, प्रास्ताविक रोम्माना सोनुले यांनी तर सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार सौरभ पाटील यांनी मानले.




