'राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं पण...'; परळीत पंकजा मुंडे यांचे भावनिक विधान, मोदींच्या कार्यशैलीचे केले कौतुक

'राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं पण...'; परळीत पंकजा मुंडे यांचे भावनिक विधान, मोदींच्या कार्यशैलीचे केले कौतुक

परळी: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. "मला कधी कधी राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, पण जनतेचा उत्साह पाहिला की नव्याने काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते," असे भावनिक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

"या रस्त्यावर खडकत-खडकत आले अन् कंटाळा आला..."

परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "या रस्त्यावरून खडकत-खडकत प्रवास करताना मी माझ्या पीएला म्हणाले, आता खरंच कंटाळा आलाय आणि राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय." मात्र, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सभास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर मला पुन्हा काम करण्याची नव्याने प्रेरणा मिळते. "ही लाल दिव्याची गाडी माझ्या स्वतःसाठी नसून तुमच्या सर्वांचा विकास करण्यासाठी आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या ८ तासांच्या बैठकीचा भावनिक अनुभव

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. दिल्लीतील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा पूर्ण करून थेट ८ तास चाललेल्या बैठकीला उपस्थित राहिले. प्रवासाचा कोणताही थकवा न दाखवता त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. या ८ तासांत केवळ २ वेळा चहा आणि १ वेळा कॉफीसाठीच विश्रांती घेण्यात आली."

"मोदी हे देशाच्या विकासाचे आणि भविष्याचे फ्रेंड आहेत. ज्यांना स्वतःचा परिवार नाही, त्यांनी या संपूर्ण देशालाच आपला परिवार मानले आहे," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.