पावसाची उसंत पण राधानगरी धरणातून २८२८ क्युसेक विसर्ग सुरू ; नदीकाठच्या गावांना ॲलर्ट
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, आज सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असे असले तरी, धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची जीवन वाहिनी असलेले राधानगरी धरण दुपारपर्यंत ९९ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गुरुवारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. या ६ नंबरच्या दरवाजातून सध्या १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
विशेष म्हणजे, गेल्या २२ जुलैपासून धरणाच्या पॉवर हाऊस म्हणजेच विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग आधीपासूनच भोगावती नदीत सुरू होता. आता ६ नंबरचा दरवाजा उघडल्यामुळे भोगावती नदीपात्रात एकूण २८२८ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
दुसरीकडे, धरण क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.राधानगरी धरण सध्या ९९ टक्के भरले आहे. वारणा धरण देखील ८३ टक्के क्षमतेने भरले आहे. तुळशी धरण ८७ टक्के भरले असून, दूधगंगा धरण ६८ टक्के भरले आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




