भंडाऱ्यातील ‘मध्यान्ह भोजन’ योजनेवर खासदार प्रशांत पडोळे आक्रमक

भंडाऱ्यातील ‘मध्यान्ह भोजन’ योजनेवर खासदार प्रशांत पडोळे आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : एफडीएच्या (FDA) माध्यमातून अनेक संस्थांवर कारवाईचा बडगा उगारणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अस्वच्छ खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या हॉटेल्सवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचदरम्यान, आता भंडाऱ्यातील मध्यान्ह भोजन योजनेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना अचानक भेटी दिल्या. यावेळी तेथील विदारक परिस्थिती पाहून धक्कादायक वास्तव समोर आले.विद्यार्थ्यांना अस्वच्छ वातावरणात तयार केलेले आणि चक्क मुदत संपलेले मसाले वापरून शिजवलेले ‘मध्यान्ह भोजन’ दिले जात असल्याचा प्रकार खासदार पडोळे यांनी उघडकीस आणला आहे.

अलीकडे आश्रमशाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा चर्चेत असतानाच काँग्रेस खासदार पडोळे यांनी अचानक काही जिल्हा परिषद शाळांच्या किचन रूममध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी समोर आलेले वास्तव अत्यंत धक्कादायक होते. मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी पुरवण्यात आलेले मसाले आणि इतर साहित्याची मुदत आधीच संपलेली होती. तरीही हेच साहित्य चिमुकल्यांच्या जेवणात वापरले जात असल्याचे आढळून आले.

शिजवण्यासाठी ठेवलेले बटाटे बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळले. तर ज्या किचन रूममध्ये हे अन्न शिजवले जात होते, तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जाही अत्यंत खालच्या पातळीचा असल्याचे पाहणीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे आता मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवणाऱ्या कंत्राटदारावर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा याविरोधात आंदोलन उभारू, असा इशाराही खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.