धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंचा दादा भुसेंवर निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा सवाल उपस्थित करत शिक्षण व्यवस्थेच्या या अवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शिक्षणमंत्री आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना आधी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवले पाहिजे, असेही ते म्हणाले.महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसतील, तर याची जबाबदारी कोणाची, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. शाळेची अवस्था पाहता दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
"शाळांच्या इमारतींना पत्रे आहेत, ती गळत आहेत. मुलांना बसण्यासाठी बेंच नाहीत. दहा वर्षांत तुम्हाला एवढंही करता आलं नसेल, तर मग तुम्ही केलं काय? दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे. शाळेची अवस्था पाहून मला वाटत नाही की त्यांनी या पदावर राहावं. जर त्यांना शिक्षणमंत्री म्हणून काम करायचं असेल, तर उद्यापासून स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत पाठवा आणि त्यांनाही याच परिस्थितीत शिकू द्या," असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, औसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खासगी शाळेचे विद्यार्थीही आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांच्या समोरच विद्यार्थ्यांनी याबाबत माहिती दिली. औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत खासगी शाळा पीपल्स प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आढळून आले आहेत. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून ही बाब समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांकडून शाळेतील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.शाळेच्या संरक्षक भिंतीसह शौचालयासाठी निधी मंजूर झालेला असतानाही मागील पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिपके यांना दिली. त्यानंतर त्यांनी उजनीच्या ग्रामसेवकांना फोन करून निधी आणि रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली. यावेळी ग्रामसेवकांनी चिडून उत्तर दिल्याचे समोर आले आहे.
यानंतर ग्रामस्थांनी शाळेतील मूलभूत सुविधांसह विविध अडचणी अभिजीत दिपके यांच्यासमोर मांडल्या. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपल्या न्याय्य हक्कांसाठी नागरिकांनी लढा दिला नाही, तर अधिकारी अधिक मुजोर होत जातात, अशी भावना अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.




