नंदुरबार हादरले! समाजकल्याण वसतिगृहात ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजन
नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात जेवणातून तब्बल ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. डाळ-भात, शेवग्याची भाजी आणि चपाती खाल्ल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची धाव, विद्यार्थ्यांचा संताप
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संभाजी पाटील, प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. "वसतिगृहात ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, याबद्दल आम्ही आधीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले," असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच एवढी मोठी घटना घडूनही वसतिगृहाचे वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न पोहोचल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या कारभारावर आणि अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातही शाळकरी मुलांना झाली होती विषबाधा
अन्नातून विषबाधा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथील एका खासगी शाळेतील ५५ ते ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता तिसरी आणि चौथीच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांना १ आणि २ जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते. या प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हे अन्न खाल्ल्यानंतर ५५ ते ६० विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. परिस्थिती बिघडल्याने अनेक मुलांना ठाण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले होते, ज्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.




