संतोष देशमुखांच्या मुलीचा मोठा खुलासा , पप्पा मला म्हणाले होते...

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी या हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रामधून धक्कादायक माहिती समजतेय. वाल्मिक कराड हा या प्रकरणामध्ये क्रमांक १ चा आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानुसार पोलिसांनी सबळ पुरावेही सादर केलेत. पाच साक्षीदार ज्यांनी थेट कराडचे नाव घेतल्याने पोलिसांचं काम आणखी सोप्पं झालं. अशातच आरोपपत्रामध्ये देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब समोर आला असून त्यामध्ये तिने वडील शेवटचं काय बोलले होते याची माहिती दिली आहे.
माझे काही बर वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांचं बोलणं झालं होतं, त्यावेळी भाऊ एवढं काय झालं नाही? कशाला इतकं ताणता? लहान गोष्टीवरून जीवावर कशाला उठता, असं वडील चाटेशी बोलत होते. जवळपास दहा-बारा मिनिटे फोन सुरू होता असं वडिलांनी मला सागितल्याचं वैभवी देशमुखने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
जेव्हा संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना मारहाण करून हकललं. त्यानंतर विष्णू चाटे याने देशमुखांना फोन केला होता. या फोननंतर देशमुख तणावामध्ये असल्याचं त्यांच्या पत्नीनेही म्हटलं होतं. ६ डिसेंबरला ही घटना झाल्यावर आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ९ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण करत त्यांनी संपवलं. आरोपींना त्यांना हालहाल करून संपवल्याचे फोटो आता समोर आले. तेव्हा महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.