दिल्लीत आज आंदोलनाचा निर्णायक दिवस! जंतरमंतरवरून अभिजीत दिपकेंचा एल्गार, संसदेकडे मोर्चाची तयारी
मुंबई (प्रतिनिधी) : नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३१ वा दिवस आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र नंतर मर्यादित स्वरूपात मोर्चाला हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आंदोलकांना जंतरमंतर ते केरळ भवनपर्यंत, सुमारे एक किलोमीटर अंतराचा मोर्चा काढण्याची परवानगी मिळू शकते. आता या प्रस्तावावर अभिजीत दिपके काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची धुरा अभिजीत दिपके यांनी सांभाळली आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा केला. गेल्या काही वर्षांत लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत, जंतरमंतरवरील आंदोलनाने लोकशाहीला नवी ऊर्जा दिल्याचे ते म्हणाले.
देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक दिल्लीत दाखल होत असल्याचा दावा करत दिपके म्हणाले की, "हे आंदोलन केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहणार नाही, असे आम्ही सांगत होतो आणि आज त्याचे चित्र प्रत्यक्ष दिसत आहे. जंतरमंतर परिसरातील रस्ते आंदोलकांनी भरून गेले आहेत. हा आमच्या आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे."
यावेळी अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान आंदोलकांनी "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" तसेच"जय भीम, जय संविधान" अशा घोषणा दिल्या.




