उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; अभ्यासकांची बैठक अन् पुढील दौऱ्याची आज घोषणा होणार?

उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; अभ्यासकांची बैठक अन् पुढील दौऱ्याची आज घोषणा होणार?

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात सुरू असलेले उपचार अर्धवट सोडून तडकाफडकी अंतरवाली सराटी गाठले आहे. अचानक उद्भवलेल्या त्रासामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.



आरक्षणाचा आढावा अन् जीआरवर चर्चा

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत राज्य सरकारने काढलेले विविध जीआर (शासन निर्णय) आणि आरक्षणासंदर्भातील योजनांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर ते पुन्हा पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार असल्याचे समजते.

पुढील दौऱ्याची आणि रणनीतीची होणार घोषणा

नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केल्यानंतर जरांगे पाटील आता या बैठकीनंतर आपल्या पुढील दौऱ्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. यात मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच, २९ ऑगस्टपासून त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आंदोलनाची हाक दिली असून, सर्व मराठा बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या नव्या आंदोलनाच्या हाकेमुळे प्रशासकीय आणि सरकारी पातळीवरही हालचालींना वेग आला आहे.