शनिशिंगणापुरात भेसळयुक्त तेलाची विक्री? एफडीएने चौकशी करण्याची देवस्थान अन् राम संघाची मागणी
अहिल्यानगर/प्रतिनिधी: देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि देवाच्या मूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने देवस्थान ट्रस्टला निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याप्रकरणी तातडीने तपासणी मोहीम राबवावी, असा सूर आता उमटू लागला आहे.

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर तक्रारींचा ओघ
राज्यात सध्या एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त पदार्थांवर धाडी टाकून कठोर कारवाई केली जात आहे. दुधातील भेसळ रोखल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळू लागला असून, शालेय पोषण आहार आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या तपासणीमुळे एफडीएच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंदिरात विक्री होणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी समोर येत आहेत.
भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
शनि शिंगणापूर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे. "भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन निकृष्ट अथवा बनावट तेलाची विक्री करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी," असे निवेदनात नमूद केले आहे.
देवस्थान प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
दरम्यान, याबाबत अन्न व औषध प्रशासनाला आधीच पत्र देण्यात आल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली. "एफडीएने तेलाचे नमुने घेतल्यानंतरच या आरोपांमधील सत्यता समोर येईल. जर तपासणीत तथ्य आढळले, तर दोषींवर कठोर कारवाई करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील," असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे येत्या काळात एफडीएकडून शिंगणापूर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून तेलाचे नमुने जप्त केले जाण्याची दाट शक्यता आहे.




