खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर सध्या अटकेची टांगती तलवार असून, त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आज कोर्टात नेमकं काय घडलं? सुनावणी का पुढे ढकलण्यात आली? याबद्दलची सविस्तर माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली आहे.

रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु, पोलिसांनी न्यायालयात त्यांचे म्हणणे सादर न केल्यामुळे ही सुनावणी आता २२ जुलै (बुधवार) पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत बोलताना अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील म्हणाले,"आम्ही शनिवारी अर्ज दाखल केला होता. रविवारी सुट्टी असल्याने आजची तारीख निश्चित झाली होती. परंतु, पोलिसांनी आज जाणीवपूर्वक त्यांचे म्हणणे मांडले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कोणत्या कारणामुळे ते म्हणणे मांडू शकले नाहीत, याचे कोणतेही लेखी स्पष्टीकरणही त्यांनी कोर्टाला दिले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना एक दिवसाची मुदत दिली असून, आता परवा (बुधवारी) यावर पूर्ण सुनावणी होईल."

बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांनी एका इमारतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, तसेच त्यांच्या खिशात आणि घटनास्थळी सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली होती.खलील शेख यांनी आपल्या मृत्यूसाठी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, वर्षा शेडगे यांच्यासह इतरांना जबाबदार धरले आहे.

 खलील शेख यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे की, त्यांचे सुमारे अडीच कोटी रुपये येणे बाकी होते. खलील शेख २०११ पासून पुण्यात सेंट्रिंगचे काम करत होते. या कामासाठी त्यांनी बाहेरून व्याजाने पैसे उचलले होते. आरोपींनी "आम्ही व्याजासहित पैसे देऊ" असे आश्वासन दिले होते, मात्र पैसे न मिळाल्याने खलील प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

खलील शेख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकरांसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्कर्ष असोसिएट या फर्ममध्ये प्रतिभा धंगेकर आणि इतर आरोपी भागीदार आहेत.मृताच्या पत्नीच्या आरोपानुसार, हे सर्वजण केवळ नावापुरते पार्टनर असून मुख्य कारभार रवींद्र धंगेकर पाहत होते.

पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कोणाचे किती पैसे येणे-देणे होते आणि या संपूर्ण गुन्ह्यात कोणाची काय भूमिका होती, हे तपासले जात आहे. गुन्हा गंभीर असल्याने योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.