पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना अटक; पोलीस दलात खळबळ

पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना अटक; पोलीस दलात खळबळ

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहर पोलीस दलात अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात एका महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले आहे. वैशाली तोटेवार असे या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून, त्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. थेट पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ही कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

वैशाली तोटेवार यांची नुकतीच लोहमार्ग (रेल्वे) पोलीस मुंबई येथे बदली झाली होती. इतकेच नव्हे तर त्यांना पुणे शहर पोलीस दलातून कार्यमुक्त (Relieve) देखील करण्यात आले होते. मात्र, बदली होऊनही आणि पदभार सोडलेला असतानाही त्यांनी 28 लाखांची मोठी रक्कम स्वीकारण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या एका प्रकरणाच्या तपासा दरम्यान एकूण 30 लाख रुपयांची मागणी झाली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधी स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 28 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून वैशाली तोटेवार या लाचेची रक्कम स्वीकारत होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तोटेवार आणि त्या खाजगी व्यक्तीला 28 लाखांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वैशाली तोटेवार यांनी ही लाच नेमकी कोणत्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी किंवा कोणासाठी घेतली होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आर्थिक गुन्हे शाखेतील एखाद्या बड्या प्रकरणाशी याचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोटेवार यांच्यासोबत आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का? याचा तपास आता एसीबीचे पथक करत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासारख्या ठिकाणीच अशा प्रकारे लाच घेतल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.