इतरांना न्याय, मग मला का नाही?; नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

इतरांना न्याय, मग मला का नाही?; नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागेल अशी आशा बाळगून असलेले छगन भुजबळ पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी राज्यसभेच्या जागेसाठी प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र जैन यांची निवड केली होती. राजेंद्र जैन यांनी सोमवारी लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार अर्ज भरला. यावेळी छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, 'अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. 'मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू', अशी सूचक टिप्पणी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी म्हटले की, भाजपकडे माझा प्रस्ताव (समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद आणि स्वत:ला राज्यसभेची उमेदवारी) मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एक दिवसच उरला होता. त्यावर भाजपकडून असं उत्तर आलं की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा समीर भुजबळ यांचा विचार करु. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्य नाही. मी नाराजी नाही, काय नाराज होणार? इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेन, अशी अट ठेवली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतात, त्यांना विचारणा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, तुर्तास भाजपने भुजबळांचा हा प्रस्ताव अंमलात आणण्यास असमर्थता दर्शविली होती.