डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगचा प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम; ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगचा प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम; ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख उपक्रमांच्या जोरावर यंदा तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

सरासरी ६.३ लाखांचे आकर्षक वार्षिक पॅकेज

यावर्षीच्या प्लेसमेंट प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सरासरी वार्षिक पगार ६.३ लाख रुपये राहिला असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.

·         मोव्हेट (Movate): ९ लाख रुपये

·         एचपी (HP): ८.५ लाख रुपये

·         टीई कनेक्टिव्हिटी (TE Connectivity): ८ लाख रुपये

·         टीसीएस (TCS): ७ लाख रुपये

·         जॉन्सन कंट्रोल्स (Johnson Controls): ५.६ लाख रुपये

·         सोलर ग्रुप व पेगासस: ५.५ लाख रुपये

·         डिलॉईट आणि ब्रिटिश पेट्रोलियम: ४.५ लाख रुपये

या दिग्गज कंपन्यांमध्ये झाली निवड

यंदाच्या प्लेसमेंटमध्ये अमेझॉन, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, डिलॉईट, ब्रिटिश पेट्रोलियम, हेक्सावेअर, एचपी, फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, शेफलर इंडिया, लुकास टीव्हीएस, गोदरेज प्रॉपर्टीज आणि बेलराईज इंडस्ट्रीज यांसारख्या विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

'वॉशिंग्टन अकॉर्ड' आणि 'एनबीए' मानांकनाचा फायदा

या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, "महाविद्यालयाला नुकतेच वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए (NBA) मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला जागतिक स्तरावर बळकटी मिळाली असून, भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक मोठ्या पॅकेजच्या संधी उपलब्ध होतील."

तसेच विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी हे यश विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे नमूद केले.

उद्योगाभिमुख प्रशिक्षणावर विशेष भर

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मॉक इंटरव्ह्यू, कोडिंग प्रॅक्टिस आणि प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व   प्राध्यापक उपस्थित होते.


अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभले.