इस्पुर्लीतील सहायक पाेलीस फौजदारासह तिघे निलंबित ; नेमकं प्रकरण काय..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आषाढ महिन्यातील यात्रेदरम्यान व्यावसायिक आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस फौजदार अजितकुमार देसाई, हवालदार कृष्णा यादव आणि कॉन्स्टेबल पंकज बारड यांचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश करवीर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर यांना देण्यात आले आहेत.
आरोपानुसार, इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी यात्रेदरम्यान व्यावसायिक आणि निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पैसे उकळले होते. त्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने दिलेले पैसे व त्यांच्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब उघडकीस आली. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दोन दिवसांत चौकशी करून दोषी आढळलेल्या तिघांवर निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच पोलीस मुख्यालयातील आस्थापना शाखेतील लिपिक संतोष पानकर आणि वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप यांच्यावर बदलीसाठी खंडणी उकळल्याच्या आरोपांमुळे कारवाई झाली होती. आता इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील तिन्ही कर्मचाऱ्यांवरही एकत्रितपणे कारवाई करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.