मुंबईत मान्सूनची चाहूल, २४ जूनपर्यंत यलो अलर्ट
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत रविवारी सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या असून, मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनपर्यंत मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील. आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुश्मा नायर यांनी सांगितले की, राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून सध्या पडणारा विखुरलेला पाऊस ही सामान्य प्रक्रिया आहे. २३ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी शहरातील विविध भागांत पावसाची नोंद झाली. वरळी येथे २५ मिमी, घाटकोपरमध्ये २४ मिमी, लोअर परळमध्ये २१ मिमी, चेंबूरमध्ये २० मिमी तर मानखुर्दमध्ये १६ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे तापमानातही घट झाली आहे. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळेत २६.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याआधी शनिवारी हे तापमान २८.६ अंशांवर होते.
यंदा मान्सून ११ जून रोजी मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, एल निनो या जागतिक हवामान घटनेमुळे वाऱ्यांच्या आणि वातावरणातील बदलांवर परिणाम झाला. त्यामुळे मान्सूनचे आगमन उशिरा झाले असून मार्चपासून मुंबईसह अनेक शहरांमध्ये उकाडा आणि दमट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.




