चंद्रकांत पाटलांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट बघायचेत; राज ठाकरेंची शिक्षणमंत्र्यांवर जोरदार टीका
मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात नव्या जेन झी पिढीला अपेक्षित असलेल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी जुन्या आणि भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडावं लागेल, असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, आमच्या लहानपणी आई सांगायची, रात्री डोक्याला तेल लावलं की बुद्धी तल्लख होते. पण एका माणसाने आयुष्यभर केसांना तेल चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. या माणसाचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो, अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
ते पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यासारखी व्यक्ती राज्याची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहे. आपण काय बोलतोय आणि जग कुठे चाललंय, याचं भान असायला हवं. पण ते म्हणतात की, आंदोलनात फेकलेल्या दगडांवरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक केल्या जाणार आहेत. मला तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी शिक्षण मिळावं म्हणून त्यांना पुण्यात पाठवलं, पण तिथेही काही उपयोग झाला नाही. अशा शिक्षणमंत्र्यांमुळे जेन झी पिढीचा संताप वाढणार नाही तर काय?
राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेन झीतील काही तरुणांनी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल अयोग्य भाषा वापरली. त्या मुद्द्यावर मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. कोणाबद्दलही खालच्या पातळीची भाषा वापरली जाऊ नये.
मात्र, त्यांनी पुढे भाजपवरही निशाणा साधत म्हटलं, हीच गोष्ट पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षातील ट्रोलर्सनाही सांगावी. महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून आमच्यापर्यंत अनेकांविरोधात सोशल मीडियावर कोणत्या भाषेत टीका केली जाते, हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील अनेक कलाकारही ट्रोलिंगला कंटाळले आहेत. गेल्या १२ वर्षांत हे वातावरण तयार झालं. तुम्ही जे पेरलं, तेच आता उगवलं आहे. पंतप्रधानांचा मुद्दा योग्य आहे, पण तो त्यांच्या पक्षातील लोकांनाही लागू व्हायला हवा. दुसऱ्यांनाही आई असते, हेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं, असे राज ठाकरे म्हणाले.




