नाशिक बैठकीत तणावपूर्ण वातावरण; महाजन-उदय सामंतांसमोर गोकुळ गीते संतापले, दराडेंकडे हातवारे करत तीव्र प्रतिक्रिया.
मुंबई (प्रतिनिधी) : मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन हे दोघेही उपस्थित असतानाच गोकुळ गीते यांचा संयम सुटला आणि ते बैठकीतच प्रचंड संतापले.बैठकीत चर्चा सुरू असताना गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे थेट बोट दाखवून आक्रमकपणे हातवारे करत आपला तीव्र विरोध आणि संताप व्यक्त केला.गोकुळ गीते आक्रमकपणे बोलताना मंत्र्यांना म्हणाले की, "सर्व मतदार माझ्या बाजूने आहेत, असे असताना संपूर्ण निवडणूक वातावरण माझ्यामुळे बिघडले आहे का?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांत दराडे गटाकडून गीते कुटुंबाबाबत जी आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती, त्यावरून गोकुळ गीते यांनी तीव्र शब्दांत रान उठवले.गोकुळ गीते यांचा आक्रमक अवतार पाहून मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी त्यांची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र सुरुवातीला गीते कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.गोकुळ गीते यांची नाराजी पाहून दोन्ही मंत्र्यांनी नरेंद्र दराडे आणि त्यांच्या समर्थकांना कडक शब्दांत तंबी दिली.यापुढे निवडणुकीच्या प्रचारात कोणतीही वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत," असा सज्जड दम मंत्र्यांनी दराडे कुटुंबीयांना दिला.
या संपूर्ण वादाच्या वेळी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सुरुवातीला जिथे मंत्री आणि गीते बंधू चर्चा करत होते, तिथून बाजूला म्हणजेच दुसऱ्या खोलीत नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे बसून होते.दोन्ही मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि दराडे गटाला समज दिल्यानंतर मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले; गोकुळ गीते यांनी आपला निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गोकुळ गीते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहील, मात्र त्यांनी दराडेंना पाठिंबा दिल्याने आता नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.




