गलिच्छ राजकारण तुम्हीच केलं; पंकजा-धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांचा जोरदार हल्लाबोल
बीड (प्रतिनिधी) : बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजकारणातील ‘एक्झिट’बाबत केलेल्या वक्तव्यांनंतर करुणा शर्मा यांनी दोघांवरही जोरदार टीका केली आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांनीच गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप करत, दोघांनीही राजकारणातून बाहेर पडावे, अशी मागणी त्यांनी केली.

करुणा शर्मा म्हणाल्या, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जर राजकारणातून एक्झिट घेण्याचा विचार करत असतील, तर त्याचे स्वागत आहे. जनतेने सत्ता दिली, पण तिचा योग्य वापर झाला नाही. दोघांनीही राजकारणातून बाहेर पडावे. त्यांच्या एक्झिटसाठी परळीत मी स्वतःच्या खर्चाने सभा घेण्यासही तयार आहे.
त्या पुढे म्हणाल्या, तुमच्या जागेवर लोकांसाठी कसं काम करायचं, हे मी करून दाखवेन. 2029 ची निवडणूक लढवून जिंकण्याचा माझा निर्धार आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी कसं काम करायचं, हे मी पाच वर्षांत दाखवून देईन.
दरम्यान, माजलगाव येथील कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सध्याच्या जातीपातीच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करत, राजकारण इतक्या गलिच्छ पातळीवर गेले आहे की कधी कधी राजकारणात राहावे की नाही, असा प्रश्न पडतो, असे म्हटले होते. मात्र, महापुरुषांच्या विचारांवर चालत समाजासाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
तर, परळीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनीही राजकारणातून निवृत्तीचा उल्लेख केला होता. जर राजकारण माझ्या विचारांशी सुसंगत वाटलं नाही, तर समृद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो, तसाच माझ्या राजकारणातही एक्झिट असेल, असे त्या म्हणाल्या होत्या.या तिन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.




