आधी उद्धव ठाकरेंकडून 'खड्डामंत्री' असा उल्लेख, आता काँग्रेसकडून 'इथेनॉल' घोटाळ्याचा आरोप; धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर?
मुंबई: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'चा पुढचा निशाणा कोण असणार? याच्या चर्चा सुरू असतानाच, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'धर्मेंद्र प्रधानांनंतर आता टोलकरी गडकरींचाही राजीनामा झाला पाहिजे,' अशी आक्रमक मागणी सपकाळ यांनी केली आहे.

"इथेनॉल कांडामुळे गाड्यांची वाट लागली" - हर्षवर्धन सपकाळ
नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे सर्वसामान्यांच्या गाड्यांची अक्षरशः वाट लागली आहे. एकीकडे नागरिकांचा छळ सुरू आहे, तर दुसरीकडे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वारेमाप पैसा कमावला आहे. हा देशातील एक मोठा 'इथेनॉल स्कँडल' असून हे कांड करणारी व्यक्ती मोदी सरकारमधील मंत्रीच आहे."
याशिवाय, ज्या वाहनधारकांचे नुकसान झाले आहे त्यांची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी आणि नितीन गडकरींनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी केला 'खड्डामंत्री' असा उल्लेख
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आनंदात रविवारी दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत 'तिरंगा रॅली' पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नितीन गडकरींवर निशाणा साधला.
भाषणाच्या ओघात उद्धव ठाकरे यांनी गडकरींचा उल्लेख “खड्डामंत्री” असा केला. मात्र, लगेचच चूक सुधारत त्यांनी “केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी” असा उल्लेख केला. याच सभेमध्ये बोलताना ठाकरेंनी, "पुढील काळात इथेनॉलच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा होईल," असे सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरेंचा हा इशारा आणि आता हर्षवर्धन सपकाळांनी थेट राजीनाम्याची केलेली मागणी पाहता, येणाऱ्या काळात 'इथेनॉल' च्या मुद्द्यावरून देशाचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




