सुतारवाडी भारी पडली उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर ?

सुतारवाडी भारी पडली उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर ?

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महायुतीतील वाढत्या अस्वस्थतेवर लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी या दोघांकडे केली. गेल्या महिनाभरात उपमुख्यमंत्री शिंदेंचा हा तिसरा दिल्ली दौरा होता. पहिल्या दोनवेळेस पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांची भेट न झाल्यानंतर अखेर या दौऱ्यात ती भेट झाली, पण अपेक्षित परिणाम मात्र दिसून आलेले नाहीत.

याचा प्रत्यय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी जाहीर करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या यादीतून आला. ही यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जाहीर झाली. नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडसाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदेसेनेनं यापूर्वी या दोघांच्या पालकमंत्री नियुक्तीवर आक्षेप घेतले होते, तरीही त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आल्याने नाराजीचा सूर वाढतो आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री शहांसोबत २५ मिनिटांची चर्चा केली, पण या भेटीपेक्षा एप्रिलमध्ये गृहमंत्री अमित शहांनी रायगड दौऱ्यावर तटकरे कुटुंबाच्या सुतारवाडी येथील घरी घेतलेला पाहुणचार अधिक महत्त्वाचा ठरल्याचं स्पष्ट होत आहे. अदिती तटकरे या रायगडमधून राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असून सध्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, तर रायगडमध्ये शिंदेसेनेचे तीन आमदार असूनही त्यांना दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील चांगले संबंध सर्वज्ञात असले, तरी या दौऱ्यानंतरही शिंदेसेनेच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. त्याउलट तटकरेंनी आपली राजकीय ताकद दाखवत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. यामागे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाजपकडे वळण्यात तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा मोलाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

विशेष म्हणजे, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र आल्यास सर्वाधिक अडचण तटकरेंना आणि पटेल यांना होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील राजकीय पर्याय खुले ठेवण्यासाठी तटकरे दिल्लीतील सत्ताकेंद्राशी संबंध मजबूत ठेवत असल्याचं दिसून येत आहे. आजवर गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरी गेलेले नाहीत, पण तटकरेंच्या सुतारवाडीच्या जेवणाचा आग्रह मात्र त्यांनी मानला आणि कदाचित याचमुळे दिल्ली दौऱ्याऐवजी सुतारवाडी अधिक परिणामकारक ठरल्याचं बोललं जातं.