उजनी धरण भरतीच्या उंबरठ्यावर! 94% पाणीसाठा, 70 हजार क्युसेक आवक; भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा 94 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून धरणात अजूनही सुमारे 70 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. प्रशासनाने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या 36 तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 15 टक्क्यांची वाढ झाली असून, अशीच आवक कायम राहिल्यास पुढील 24 तासांत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वीर धरणातून सोडलेले 25 हजार क्युसेक पाणी पंढरपुरात पोहोचल्याने अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही शेतकऱ्यांना दिलासा देत, उजनी धरण पूर्ण भरल्याने खरीप हंगामासाठी पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे सांगितले. तसेच शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठ्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उजनी धरणातील वाढता पाणीसाठा हा सोलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असली, तरी नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




