दिपके कुटुंबाशी आमचे जुने नाते ; अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? मंत्री संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं खरं कारण
छत्रपती संभाजीनगर : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी देशभरात उठलेल्या जनआक्रोशानंतर आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या यशाचा आनंदोत्सव एकीकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर साजरा होत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विशेष भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेल्या अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची सदिच्छा भेट घेतली.
भेटीमागचे नेमके कारण काय? - संजय शिरसाट
या भेटीबाबत बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "दिपके कुटुंबाशी आमचे जुने आणि कौटुंबिक नातेसंबंध आहेत. आंदोलन सुरू असताना या विषयाला कोणतेही राजकीय वळण लागू नये, म्हणून मी त्यावेळी त्यांच्या घरी आलो नव्हतो. आता आंदोलन संपले असून अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी येथे आलो आहे. सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल."
या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनीही प्रतिक्रिया दिली. "मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणामुळे मनातील शंका दूर झाली आहे. आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आम्हाला प्रचंड आनंद आहे," असे त्यांनी म्हटले.
'इंडिया आघाडी कधीच ब्लॉक झालीये' - उद्धव ठाकरेंवर टोला
उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत 'इंडिया आघाडी ब्लॉक झाली' असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
"इंडिया आघाडी ही गेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच ब्लॉक झाली आहे. त्यांच्यात कोणतीही एकवाक्यता उरलेली नाही. दिल्लीतील आंदोलनातही आपापल्या पद्धतीने क्रेडिट घेण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू होती. आता इंडिया आघाडी राहिलेली नाही, हे अखेर उद्धव ठाकरेंना मान्य करावेच लागले," असा टोला त्यांनी लगावला.




