पोलिसांचा लाठीचार्ज अन् देशातील असंतोष टळला असता; छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, सर्वांशी संवादाची केली मागणी
मुंबई: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या तीव्र असंतोषानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर आता महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

"१५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता तर हे घडले नसते"
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "जे घडले ते सर्व देशाच्या आणि जगाच्या समोर आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच राजीनामा दिला असता तर जंतर-मंतरवरील लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि देशभरात पसरलेली संतापाची लाट या गोष्टी घडल्याच नसत्या. धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी या विषयावर त्यांच्याशी वेळीच चर्चा करायला हवी होती."
"सोनम वांगचुक यांनाही २६ दिवस उपोषण करावे लागले"
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी इतर आंदोलनांचा दाखला देत संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. "सोनम वांगचुक यांनाही २६ दिवस उपोषण करावे लागले होते. जेव्हा घटना हाताबाहेर जातात, तेव्हा लोकांच्या मनात तीव्र संतापाची लाट निर्माण होते. आता हा लोकांचा संताप शांत करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने सर्वांशी संवाद साधायला हवा," अशी मागणीही भुजबळ यांनी केली.
आंदोलनानंतर केंद्र सरकारवर वाढला होता दबाव
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनीही याप्रश्नी थेट आंदोलनात उतरत सरकारला घेरले होते. अखेर वाढत्या चौफेर दबावामुळे केंद्र सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.




