डीजे आणि डॉल्बीवर बंदी येणार नाही? साताऱ्याच्या SP नी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले
सातारा (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सणांच्या काळात डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी हा मुद्दा राज्य स्तरावर उपस्थित केला होता. त्यानंतर गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात डीजेवर बंदी होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी डीजेवर सरसकट बंदी येऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी डॉल्बी आणि डीजेमधील फरकही समजावून सांगितला.

डॉल्बी ही एक टेक्नॉलॉजी आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बीवर बंदी घालण्याचे निर्देश दिलेले नाहीत. मात्र, माणसाच्या आरोग्याला त्रास होणार नाही, इतकीच आवाजाची मर्यादा ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तर डीजे म्हणजे डिस्को जॉकी. त्याचं मुख्य काम गाणी बदलण्याचं असतं. त्यामुळे डीजेवरही थेट बंदी घालण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, डीजे आणि डॉल्बीबाबतच्या आपल्या संकल्पना अनेकदा चुकीच्या असतात, असं निखिल पिंगळे यांनी सांगितलं.
दरम्यान, स्पीकरच्या आवाजाची क्षमता वाढवण्यासाठी काही विक्रेते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. प्लाझ्मा, मिड प्रेशर बेस साऊंड सिस्टीम यांसारख्या तंत्रज्ञानामुळे कमी स्पीकर असूनही मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. दोन स्पीकर दिसत असले तरी त्यांचा आवाज दहा स्पीकरइतका असू शकतो. अशा प्रकारची अतिरिक्त किंवा ऑगमेंटेड उपकरणं वापरली जात असतील, तर त्यावर कारवाई करून ती जप्त केली जाऊ शकतात. कारण मुख्य मुद्दा हा डीजे किंवा डॉल्बीचा नसून आवाजाच्या मर्यादेचा आहे.
मोठ्या आवाजामुळे तरुणांच्या कानांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा. अगदी मोठ्या आवाजात स्पीकर लावणार असाल, तर आधी आपल्या घरातील आजी-आजोबांना तिथे बसवून पाहा, असा टोला देखील निखिल पिंगळे यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही गणेशोत्सवातील डॉल्बी-डीजेच्या वापराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी नसून, आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, गणपती मंडळांना महाप्रसादासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कराड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रंजनकुमार शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीबाबत सरसकट बंदीपेक्षा आवाजाची मर्यादा पाळण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं स्पष्ट होत आहे.




