कष्टकरी बहिणींच्या डोक्यावर हक्काचं छप्पर; स्वतःचं घर मिळवून देण्याचा आमदार सत्यजीत तांबेंचा निर्धार
तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी; तुमच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही माझीच
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घरकाम करणाऱ्या, विडी कामगार तसेच कष्टकरी महिलांनी आमदार सत्यजीत तांबे यांना राखी बांधून आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याला आणखी घट्ट केले. अनेक वर्षांपासून या माता-भगिनींचे तांबे परिवाराशी असलेले विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते यावेळीही प्रकर्षाने दिसून आले. यावेळी उपस्थित बहिणींना भावासारखा आधार देत “तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुमच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही माझीच आहे,” असा भावनिक शब्द आमदार तांबे यांनी दिला.

घरकाम, विडी काम, दुकानांमध्ये मजुरी अशा विविध माध्यमातून स्वतः कष्ट करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांच्या संघर्षाची जाणीव असल्याचे सांगत तांबे म्हणाले, “तुम्ही आपली कामं सोडून माझ्याकडे आलात, राखी बांधलीत, यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्यासाठी केवळ राखी बांधणाऱ्या बहिणी नाही, तर माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुमच्यावर कोणतीही अडचण आली, तर बिनधास्तपणे माझ्याकडे या; माझे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत.
सरकारी योजनांचे बदलते नियम आणि किचकट प्रक्रिया यामुळे अनेक कष्टकरी महिला विविध योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपण घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी नियमांमध्ये जे जे बसते, त्यापासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहणार नाही, याची आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ,” असा विश्वास त्यांनी दिला.
‘प्रत्येक बहिणीला स्वतःचं घर’ हे ध्येय
यावेळी घरकुलाच्या प्रश्नावर बोलताना आमदार तांबे यांनी कष्टकरी महिलांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. स्वतःची जागा असलेल्या कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आवश्यक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असून, ज्यांच्याकडे स्वतःची जागाच नाही, अशा कुटुंबांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
घरकाम करणाऱ्या बहिणींचं स्वतःचं छोटंसं का होईना, पण हक्काचं घर असावं, हे त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,असे तांबे म्हणाले.
लक्ष्मीपुरा परिसरात घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे नियोजन असून, तेथे राहणाऱ्या पात्र कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वतःच्या जागेअभावी घराच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल १,५०० कुटुंबांनी नावनोंदणी केली असून, पुढील काही वर्षांत या सर्व कुटुंबांच्या घराच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
राखी बहिणीने बांधली, पण जबाबदारी दोघांची
तुम्ही मला वेळोवेळी तुमचे प्रश्न सांगत राहा. ते प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे. हा भाऊ तुमच्यासाठी सदैव उभा राहील, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी दिली.




